गणेश चतुर्थी काय आहे
दर महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला अनेकजण नियमित उपवास करतात. पण चतुर्थी म्हणजे नेमकं काय, ती का केली जाते, याबद्दल सगळ्यांनाच माहिती असतेच असं नाही. म्हणूनच गणेश चतुर्थी तसंच इतर चतुर्थी व्रतांची ओळख या लेखातून करून दिली आहे.
नवीन वर्षांचे कॅलेंडर आले की बहुतेक मराठी माणसे गणेश चतुर्थी कधी आहे ते प्रथम पाहतात. ‘‘यंदा गणपती लवकर आहेत’’ किंवा ‘‘अधिक महिना आल्यामुळे गणपती पुढे गेले’’ ही वाक्ये हमखास ऐकू येतात. याचे कारण असे की, वर्षांत इतर कार्यक्रम किंवा उत्सव होवोत न होवोत, गणेश चतुर्थीचा उत्सव मात्र नक्कीच होतो. तरुण पिढीला हा उत्सव साजरा करण्याचा प्रचंड उत्साह असतो. पण काही अशीही घरे असतात जिथे केवळ वृद्ध आहेत पण तरीही घराण्याचा कुलाचार पाळण्यासाठी आवर्जून गणपती आणला जातो. दर वर्षी नेमाने येणारी गणेश चतुर्थी आपल्या इतकी अंगवळणी पडली आहे की तिची परंपरा काय होती याचा विचार क्वचितच आपल्या मनाला शिवत असेल. या लेखाद्वारे आपण गणेश चतुर्थी आणि इतर चतुर्थी व्रतांची ओळख करून घेणार आहोत.
चतुर्थी चिंतन
गणेशाची उपासना अत्यंत प्राचीन आहे. परंतु त्याला ‘सुखकर्ता, दु:खहर्ता’ हे स्वरूप साधारण पाचव्या-सहाव्या शतकात प्राप्त झाले. विविध पुराणांत गणेशाच्या पूजा, व्रते इत्यादी आढळतात. त्यांचा मूळ उद्देश विघ्ननाश, संतती, संपत्ती प्राप्त करणे असा आहे. ज्योतिषशास्त्रात चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी या ‘रिक्ता’ तिथी आहेत. ‘रिक्ता’ म्हणजे कार्यसिद्धी न होणाऱ्या तिथी अशी धारणा असल्याने बहुतेक सर्वच मुहूर्तासाठी या तिथी वज्र्य केल्या जातात. गमतीची गोष्ट म्हणजे गणेश व्रतासारख्या काम्य उपासनेसाठी चतुर्थी या रिक्ता तिथीची योजना केली आहे. नवमी आणि चतुर्दशी दुग्रेच्या उपासनेला योग्य आहेत तर अनंतव्रत आणि शिवरात्री चतुर्दशीच्या दिवशी करतात. असे का असावे हे एक कोडे आहे. मुहूर्तज्ञान असणारे विद्वान यावर काही भाष्य करू शकतील.
भारतीय संस्कृती कोशात नमूद केले आहे की काही संत मंडळी चतुर्थी तिथीचा अध्यात्मिक अर्थ सांगतात. ते म्हणतात की अकार, उकार, मकार या ओंकाराच्या मात्रांच्या पलीकडील जी अव्यक्त मात्रा आहे तिला चतुर्थी मात्रा म्हणतात. ही जागृत, स्वप्न, सुषुप्ती या पलीकडची तुरीय अवस्था असल्यामुळे आदिदेव गजाननाला अशी चतुर्थी प्रिय आहे.
ऐतिहासिक पाश्र्वभूमी
शिलाहार, कदंब आणि चोळ राजवटीत दक्षिण भारतात गणेश उपासना अधिक लोकप्रिय झाली. राजकुलाचा उपास्य असणारा गणपती, लोकमानसात अधिक मान्यता पावला तर नवल नाही. सुरुवातीस गणेशाची मंदिरे शिव मंदिरांच्या आश्रयाने दक्षिणेत निर्माण झालेली आढळतात. कदंब राजवटीत गोकर्ण, इडगुंजी इत्यादी ठिकाणी लहान परंतु स्वतंत्र गणेश मंदिरे झाली. तामिळनाडू, आंध्र प्रदेशातसुद्धा गणपती अतिशय लोकप्रिय झाला. बाराव्या शतकातील कन्नौजस्थ लक्ष्मीधर लिखित ‘कृत्यकल्पतरू’ आणि तेराव्या शतकातील देवगिरीच्या हेमाद्री पंडितांचा ‘चतुर्वर्गचिंतामणि’ या धर्मशास्त्रविषयक उभय ग्रंथांत भाद्रपदातील पाíथव सिद्धिविनायक व्रताची सध्याची पद्धत सापडत नाही. धर्मशास्त्र ग्रंथातील दाखला घ्यायचा झाला, तर थेट सतराव्या शतकातील कमलाकर भट्ट लिखित ‘निर्णयसिंधु’मध्ये तसेच अठराव्या शतकातील ‘अहल्याकामधेनु’ आणि काशिनाथ उपाध्ये निर्मित ‘धर्मसिंधु’ या ग्रंथांमध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या सिद्धिविनायक व्रताचा उल्लेख येतो. त्यात या व्रताचा तिथिनिर्णय कसा करावा हे लिहिले आहे.
लक्षणीय गोष्ट ही आहे की, गणेशोपासनेचे अध्वर्यू मानल्या गेलेल्या श्रीमोरया गोसावी यांच्या चिंचवड देवस्थानात पाíथव गणेश पूजन होत नाही. भाद्रपद शुक्ल प्रतिपदेला तिथून देवाची पालखी निघते आणि तृतीयेला मोरगावी मोरेश्वराकडे पोहोचते. चतुर्थीला पालखीतील मंगलमूर्तीच्या तांदळ्याचे कऱ्हा नदीत स्नान होते. पंचमीस अन्नदान होते आणि पालखी पुन्हा चिंचवडच्या मार्गाला लागते. चिंचवडचे ग्रामस्थ घरी गणपती आणत नाहीत. ते मंगलमूर्तीची यात्रा करतात अशी माहिती मिळते. असेच दृश्य रांजणगाव आणि ओझर गावात पाहायला मिळते. सिद्धटेकलासुद्धा पाíथव गणेश पूजन होत नाही. गोकर्णक्षेत्री सात दिवसांचे कौटुंबिक गणेशोत्सव होतात, पण इडगुंजीला कौटुंबिक उत्सव होत नाहीत. तिथे सर्व लोक गणेशाच्या देवळात जाऊन विशेषपूजा आणि हवनात सहभागी होतात. काशीमध्ये असणाऱ्या बडागणेश मंदिरात भाद्रपदातील गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होत नाही. या माहितीवरून असा निष्कर्ष निघतो की, भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा गणेशोत्सव निदान सतराव्या शतकापर्यंत तरी बहुसंख्य कुटुंबांमध्ये कुलाचार बनला नव्हता. तसा तो असता, तर लोकांच्या गणेश पूजनाच्या कुलाचारात खंड पाडेल असा पालखी उत्सव मोरया गोसावी यांनी सुरू केला नसता.
आज गणेश चतुर्थी व्रत महाराष्ट्रासह सर्व दक्षिण भारतात केले जात असले, तरी महाराष्ट्राइतके त्याचे मोठे स्वरूप आपल्याला दिसत नाही. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ प्रांतात ते केवळ एका दिवसाचे असते. काही प्रांतांत सकाळी गणेशाचे आवाहन करून संध्याकाळी विसर्जन होते. गोव्यात बहुतांशी दीड दिवस गणेशोत्सव असतो. हल्ली उत्सवप्रियतेमुळे अधिक दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल वाढत आहे.
या पाश्र्वभूमीवर आपण पुराणातील काही गणेश व्रते, चतुर्थी व्रते आणि त्याच्या आसपास असणाऱ्या अन्य व्रतांचा विचार करणार आहोत.
भाद्रपदात मयूरेश्वर अवतार
गणेश पुराणामध्ये त्रेतायुगात, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला, अभिजीत मुहूर्तावर उमेच्या पोटी मयूरेश्वर नावाचा गणेशाचा अवतार झाला आणि त्याने बक, नूतन, सिंधू तसेच कमलासुर या दैत्यांना मारले असा उल्लेख आहे. अशा रीतीने जन्मत:च मयूरेश्वर गणपतीचा संबंध भाद्रपद शुक्ल चतुर्थीशी जोडला गेला आहे. या पुरणाचा काळ काही अभ्यासक १६-१७ वे शतक असा मानतात तर काही १२-१३ वे शतक मानतात. परंतु हे पुराण यापेक्षा अधिक जुने नसावे यावर बहुतेक अभ्यासकांचे एकमत आहे.
भाद्रपद शुक्ल चतुर्थी व्रत
शिवपुराणातील विद्य्ोश्वर संहितेच्या सोळाव्या अध्यायात भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या पाíथव गणेश व्रताचे बीज सापडते. वरील अध्यायात मूर्ती निर्माण आणि पूजा हे वण्र्य विषय आहेत. पाíथव मूर्ती पूजनाचा अधिकार स्त्री-पुरुषांना समान आहे. नदी, तलाव किंवा विहिरीतली माती वापरून गणेश, सूर्य, विष्णू, दुर्गा आणि शिवमूर्ती बनवाव्यात असे निर्देश आहे. पुढे असे म्हटले आहे की, विघ्नराज गणेशाच्या पूजनाने भूलोकी इच्छित वस्तूंची प्राप्ती होते. शुक्रवार, श्रावण आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीस आणि पौष मासातील शततारका नक्षत्रावर गणेशाचे पूजन अवश्य करावे. तिथपासून पुढे शंभर दिवस अथवा एक हजार दिवस नियमित पूजा करावी. आता मात्र या व्रताचा कालावधी शंभर/ हजार दिवसांच्या शतांशावर म्हणजे दीड ते दहा दिवसांवर आला आहे.
पुढे असा उल्लेख आहे की, प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्थी (संकष्टी)ला होणारी गणेश पूजा पंधरवडय़ात घडलेल्या पापांचे परिमार्जन करते आणि पंधरा दिवसांसाठी शुभ फल देते. चत्रमासातील चतुर्थीवर गणेश पूजन केले असता महिनाभर केलेल्या पूजनाचे फळ मिळते. तसेच सिंह राशीत सूर्य असता भाद्रपद मासातील चतुर्थीला केलेल्या पूजनाने संपूर्ण वर्षभर मनोवांच्छित भोग प्राप्त होतात. प्रतिवार्षकि गणेश चतुर्थी साजरी करण्याच्या प्रथेला या वचनानुसार पौराणिक आधार मिळतो.
शिवपुराणाच्या रचनेचा नक्की काळ सांगता येत नाही. त्यातील काही भाग दहाव्या- अकराव्या शतकात रचला गेला आणि काही भाग चौदाव्या शतकात रचला गेला असे अभ्यासक म्हणतात. त्यातील काही संहिता लुप्त झाल्या आहेत. चतुर्वर्गचिंतामणिमध्ये या पुराणाची दखल घेतली गेली नाही याचा अर्थ निदान बाराव्या शतकापर्यंत शिवपुराण जास्त प्रचलित नसावे.
अग्निपुराणातील चतुर्थी व्रते
अग्निपुराण अध्याय १२९ मध्ये चतुर्थी तिथीची व्रते आली आहेत. माघ शुक्ल चतुर्थीला गणेश पूजन करून पंचमीला तिलयुक्त भोजन करावे म्हणजे बऱ्याच वर्षांपर्यंत विघ्नरहित काल प्राप्त होतो असे त्यात म्हटले आहे. इच्छापूर्तीसाठी अंगारक चतुर्थी (मंगळवारी येणारी चतुर्थी)चे व्रत असते. ‘अविघ्ना चतुर्थीला’ म्हणजे फाल्गुन चतुर्थीला केवळ रात्री भोजन करावे असा उल्लेख आहे. चत्र शुक्ल प्रतिपदेला ‘दमनक चतुर्थी’ असे नाव आहे. त्या दिवशी गणेशाला दवणा वाहवा म्हणजे सुखप्राप्ती होते असे वचन आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश पूजन करणारा शिवलोक प्राप्त करतो असे म्हटले आहे. असाच उल्लेख पुढील व्रत समूहात दिसतो.
शिवा-शांता-सुखी चतुर्थी
भाद्रपद चतुर्थीचा विचार करताना ‘चतुर्वर्गचिंतामणि’च्या व्रतखंडातील भविष्यत्पुराणोक्त शिवा, शांता आणि सुखी अशा तीन चतुर्थी व्रतांची दखल घ्यावी लागेल. ही तिन्ही व्रते गणेशाशी संबंधित आहेत. सुमंतू शतानीकास सांगतो की, भाद्रपद शुक्ल पक्षात जी चतुर्थी येते तिला ‘शिवा’ चतुर्थी म्हणतात. या दिवशी स्नान, दान, उपवास आणि जप केले असता ‘दंती’ (गणेश) प्रसादाने शतगुणित फळ मिळते. गूळ, लवण (संधव/ मीठ), तूप आणि त्याचबरोबर गूळ घातलेल्या अपूपांचे दान शुभ समजतात. या दिवशी ब्राह्मण भोजन करवावे. गूळ आणि लवण देऊन स्त्रिया, सासवा आणि आजे-सासवा यांचे पूजन करावे. विघ्नेशाच्या प्रसन्नतेने त्या (व्रत करणाऱ्या पुरुषासाठी) भाग्यशाली ठरतात. वरीलप्रमाणेच विशेषकरून लहान मुलींची पूजादेखील करावी.
माघ महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला शांता असे नाव असून ती शांती देणारी आहे. यात वरीलप्रमाणेच स्नान, दान, जप, उपवास याबरोबर गणेशाप्रीत्यर्थ लवण, गूळ आणि तुपाचे हवन करून बलिकर्म करावे, तसेच स्त्रिया आणि गुरूंचे गूळ, लवण आणि तूप देऊन पूजन करावे असे विधान आहे. या व्रताने केलेल्या कर्माचे सहस्रपट फळ गणेशकृपेने मिळते.
तिसरी सुखी चतुर्थी म्हणजे अंगारक चतुर्थी. पण इथे गणेशपूजा अल्प असून मंगळाची पूजा बरीच मोठी सांगितली आहे. ही पूजा चार अंगारक चतुर्थीना करावी. या पूजेचे फळ म्हणजे व्रती मनुष्य इहलोकी रूप तसेच आरोग्य यांनी संपन्न होऊन गणेशाचा गण होतो आणि महापातकापासून दूर होऊन अंती भीम(शिव) लोकास जातो.
या सर्व व्रतांमध्ये स्त्रियांचे पूजन ही विशेष बाब आहे. सुवासिनी, सासू, आजेसासू आणि लहान मुली अशा चार पिढय़ांतील स्त्रियांचे पूजन क्वचितच कोणत्या व्रतात आढळते. पुरुष दैवताचे व्रत असता, स्त्रियांना आणि त्यातल्या त्यात सासरच्या स्त्रियांना इतके महत्त्वाचे स्थान प्राप्त व्हावे ही गोष्ट आश्चर्याची आहे.
अग्निपुराण आणि शिवपुराणातील व्रतात रुद्रलोक प्राप्ती हे फळ वारंवार सांगितले असल्याने, गणेशाची उपासना शैव संप्रदायात एक महत्त्वाचे परंतु लहान अंग होते असे वाटते.
गणेश जन्म व चतुर्थी व्रत
शिवपुराणातील रुद्रसंहितेच्या अठराव्या अध्यायात गणेशजन्म आणि चतुर्थीव्रताची कथा येते. ही कथा आपल्याला सुपरिचित आहे. पार्वतीने स्वत:च्या शरीराच्या मळापासून एका अलौकिक बालकाची निर्मिती केली. शंकराने युद्धात क्रोधवश त्याचा शिरच्छेद केला. पार्वतीचा संताप अनावर झाला. यातून त्रलोक्यावर संकट येऊ नये यास्तव शंकराने हत्तीचे डोके बालकाच्या धडावर स्थापित केले आणि त्याला आपला पुत्र मानून गजानन, गणेश वगरे नावे देऊन शिवगणांचा अधिपती केले. इथे आणखी एका गणेशचतुर्थीव्रताचा विधी दिला आहे.
शंकर असे सांगतो की हे पुत्रा, भाद्रपद मासाच्या कृष्णपक्षात चतुर्थी तिथीला रात्रीच्या प्रथम प्रहरात जेव्हा चंद्राचा उदय झाला तेव्हा पार्वतीच्या मनात तुझे स्वरूप स्फुरले. याकरता त्या दिवसापासून पुन्हा तीच तिथी येईपर्यंत (म्हणजे वर्षभर कृष्णपक्षातील) चतुर्थीला तुझे उत्तम व्रत केले जाईल. या दिवशी मनुष्याने भक्तिपूर्वक विधिवत तुझे पूजन करावे. जेव्हा मार्गशीर्ष कृष्णचतुर्थी येईल तेव्हा प्रात:काली स्नान करून ब्राह्मणांना आपण स्वत: व्रत करीत आहोत असे सांगून त्यांना त्यासाठी निमंत्रित करावे. दिवसभर उपवास करावा. धातू, पोवळे, पांढरी रुई (मूळ) किंवा मातीपासून गणेशमूर्ती बनवावी आणि तिची प्राणप्रतिष्ठा करून पूजा करावी. रात्रीचा प्रथम प्रहर झाला की स्नान करून दूर्वानी गणेशमूर्तीचे अर्चन करावे. मग बालचंद्रम्याचे पूजन करावे. ब्राह्मणभोजन झाले की मिष्टान्नाचे परंतु अळणी जेवण जेवावे.
असे व्रत वर्षभर करून भाद्रपद कृष्णचतुर्थीला त्याचे उद्यापन करावे. त्या वेळी कलशावर गणेशमूर्तीचे पूजन करून, हवन, ब्राह्मणभोजन या बरोबरच दोन स्त्रिया आणि दोन बटूंची पूजा करावी. रात्रभर जागरण करावे. सकाळी पूजा विसर्जति करून पूजलेल्या बटूंच्या चरणी नत होऊन आशीर्वाद मागावा आणि व्रताच्या पूर्तीसाठी त्यांना पुष्पांजली वाहावी. हे व्रत इच्छित फळ देणारे आहे. सर्व वर्णातील लोकांसाठी आणि विशेषत: स्त्रियांसाठी हे व्रत शुभफलदायी आहे. राजपुरुषांनीसुद्धा असे व्रत अभ्युदयासाठी करावे.
या व्रताचा संबंध भाद्रपद मास, चतुर्थी तिथी आणि पाíथव गणेशाचे पूजन या तीन गोष्टींशी आत्ताच्या गणेशचतुर्थी व्रतासारखा आहे. परंतु हे व्रत संकष्टीप्रमाणे कृष्णपक्षात करायचे आहे. तेही रात्रीच्या पहिल्या प्रहरी अर्थात सूर्यास्तानंतर दोन-तीन तासांत करावयाचे आहे हे त्याचे वैशिष्टय़. धर्मासिंधूत मात्र गणेशोत्सवास ‘मध्यान्हव्यापिनी’ शुक्लचतुर्थी म्हणजे दुपारच्या काळ व्यापणारी चतुर्थी पूजेसाठी घ्यावी असे वचन आहे.
स्कंदपुराणोक्त कृच््रछचतुर्थी व्रत
कृच््रछ हा प्रायश्चित्ताचा एक कठीण प्रकार स्मृतींमध्ये सापडतो. देहदंडनातून पापमुक्ती साधणे हा त्याचा उद्देश होता. स्मृतींचे अनुयायी असणारे स्मार्त लोक, कृच््रछ व्रत करीत असत. पुढे पुराण प्रतिपादित भक्तिमार्गात पापक्षयासाठी या कठोर प्रायश्चित्तांची जागा नामसंकीर्तन आणि एकादशी, शिवरात्री इत्यादी तुलनेने सौम्य व्रतांनी घेतली. चतुर्थी कृच््रछव्रत हे अशाच व्रतांत मोडते. हे व्रत सलग काही आठवडे करायच्या ऐवजी ते चार वर्षांच्या कालावधीत वाटले गेले आहे. एका अर्थी ते प्रायश्चित्त आहे आणि दुसरीकडे ते काम्य व्रतसुद्धा आहे.
मार्गशीर्ष शुक्लचतुर्थीला विविध उपचारांनी गणेशपूजन करून व्रत करण्याचा संकल्प करावा. एक वर्षभर चतुर्थीला दिवसा एकवेळ जेवावे. याला एकभुक्त म्हणतात. दुसऱ्या वर्षी चतुर्थीला नक्त म्हणजे उपवास रात्री सोडावा. तिसऱ्या वर्षी अयाचित म्हणजे चतुर्थीचा उपवास सोडण्यासाठी कोणी काही आणून दिले तरच खावे, खायला मागू नये. चौथ्या वर्षी चतुर्थीस पूर्ण निराहार राहावे. असे व्रत करून पाचव्या वर्षी उद्यापन करावे. या व्रताचा हेतू विघ्ननाश आणि समृद्धीची प्राप्ती आहे.
असे दूर्वागणपती व्रत
सूर्यपुराणातील काíतकेय आणि शिव संवादातून हे व्रत उलगडते. राज्यलाभ, शत्रुजय याबरोबर वर्ण आणि आश्रम नसणाऱ्या माणसांसाठी हे व्रत सिद्धिप्रद असावे अशी इच्छा स्कंद व्यक्त करतो. वर्णाश्रमाच्या नियमांचे पालन हीच एक काळ धर्माची व्याख्या होती. त्या कक्षेच्या बाहेरील माणसांमध्ये तत्कालीन सामाजिक घडीला आणि रूढींना आव्हान देणारे पाशुपत किंवा तत्सम संप्रदाय, वेद न मानणारे पंथ अथवा म्लेंच्छ जातीच्या लोकांचा समावेश असणे शक्य होते. गणेश अनेक जमातींमध्ये आणि अनेक प्रदेशांत प्राचीन दैवत असल्याने या लोकांमध्ये कदाचित गणेश उपासना आधीच रूढ असणे शक्य असावे. अशा लोकांना समाजातील प्रस्थापित उपासना मार्गाशी जोडण्यासाठी, दूर्वागणपती व्रतासारखी व्रते सेतूचे काम करीत असावीत.
हे पंचवार्षकि व्रत श्रावण अथवा काíतक शुक्ल चतुर्थीला सुरू करायचे असते. याच्या उद्यापनाला दूर्वायुक्त पंचगव्याने गणेशास स्नान घालून दहा मंत्रांनी दूर्वाचे अर्चन करायचे असते. सोने अथवा चांदीची गणेशमूर्ती गुरूंना दान द्यायची असते.
आता आपण गणेश चतुर्थीशी संबंधित काही व्रतांची दखल घेऊन त्यांचा गणेशोत्सवाशी कसा काय संबंध आला ते पाहू.
हरितालिका आणि गौरीचे व्रत
‘हरितालिका’ नावाशी जुळणारे परंतु विधीने भिन्न ‘हरिकाली’ व्रत भाद्रपद शुक्ल तृतीयेला करावे असे चतुर्वर्गचिंतामणीमध्ये म्हटले आहे. दक्षकन्या श्यामवर्णा काली हिला शंकराने लाडाने सर्वादेखत ‘‘काळी असलीस तरी मला तू खूप आवडतेस’’ असे म्हटले. त्यामुळे तिने चिडून हिरवळीवर स्वतची हरित सावली फेकली आणि अग्निप्रवेश करून ती पुढील जन्मी हिमालयाची कन्या गौरी झाली. या सावलीतून कात्यायनी देवी निर्माण झाली, जिने देवांना संग्रामात मदत केली. या देवीला ‘हरिकाली’ म्हणतात. पुरुष आणि प्रामुख्याने स्त्रिया तिची पूजा करतात. या व्रतात सुपामध्ये सात धान्ये पेरून त्यांचे अंकुर आले की त्यावर देवीचे आवाहन करून पूजन करावे. जागरण करून पहाटे उजाडायच्या आत तिचे तळे वगरे पाण्याच्या स्थळी विसर्जन करायचे. असे व्रत दरवर्षी केले असता इहलोकी सुख मिळते आणि अंती रुद्रलोक प्राप्त होतो.
हरताळकेचे व्रत कृत्यकल्पतरू किंवा चतुर्वर्गचिंतामणी यामध्ये नसून निर्णयसिंधू, व्रतराज, अहल्याकामधेनु या उत्तर मध्ययुगीन ग्रंथांत हे व्रत भाद्रपद तृतीयेला आढळते. असे असले तरी अकराव्या शतकाच्या पूर्वार्धात रचलेल्या भोजाच्या ‘राजमरतड’ या ग्रंथांत हरिताली चतुर्थीसंबंधी चार श्लोक सापडतात. भाद्रपद शुक्ल पक्षात हस्त, चित्रा आणि स्वाती नक्षत्रावर चतुर्थी असता त्या तिथीला ‘हरिताली’ म्हणतात, जी पार्वतीला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे हरताळका व्रत कधी काळी सांप्रतच्या गणेश चतुर्थीला करीत असावेत.
या व्रताचे स्वरूप उमामहेश्वर यांचे पूजन असे आहे. विशेषत: सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक किनारपट्टीवर बऱ्याच कुटुंबांत ते पूजन गणपतीच्या दिवशी होते. त्यांचे पूजन केल्याशिवाय गणेशाचे पूजन करीत नाहीत. कर्नाटकात हरताळकेच्या दिवशी सुवर्णगौरी व्रत असते. यात गौरीचा केवळ मुखवटा पुजतात. महाराष्ट्रात मात्र हरताळका तृतीयेच्या दिवशी पुजतात. बहुतेक ठिकाणी पार्वती, तिची सखी आणि एक शिविलग यांचे मातीचे विग्रह पुजण्याचा प्रघात आहे. या मूर्तीची बीजे मात्र पुढे वर्णन केलेल्या पंचिपडिका गौरी व्रतात असावीत असे वाटते.
पंचिपडिका गौरी व्रत
भाद्रपद शुक्ल तृतीयेला गौरीशी संबंधित काही अन्य व्रते आहेत. त्यातले पाहिले आहे पंचिपडिका गौरी व्रत. यात मुठीइतक्या मातीच्या पिंडांच्या चार गौरी करतात. या चार गौरींतील एक गवर पाच पिंडांची असते, अथवा केवळ पाचच पिंड करावेत. रात्रीच्या प्रत्येक प्रहरात एक एक गौरी पुजायची. नृत्य-गायन करायचे. शेवटी पाच पिंडांची गौरी चौथ्या प्रहरात पुजायची आणि सकाळी तलावात गौरींचे विसर्जन करायचे. गौरीला इथे पंचभूतात्मक मानले आहे. पहिल्या प्रहरात केवळ गौरी, दुसऱ्या प्रहरात अर्धनारिश्वर, तिसऱ्यात उमा-महेश्वर आणि चौथ्यात पंचभूतात्मक पाच िपडांची गौरी असे ध्यान या पूजेत आहे.
आणखी एक गौरी व्रत चत्र, भाद्रपद आणि माघ मासांत तृतीयेच्या रात्री करायचे असते. या व्रतामध्ये भाद्रपदात जी तृतीया येईल त्यात गौरीचे आवाहन सुपात ठेवून करतात. तसेच त्या त्या ऋतूतील फुले, फळे, धान्ये, मिष्टान्न वगरे सुपात भरून देवीसमोर ठेवतात. रात्रभर जागरण असते.
वरील माहितीवरून असा निष्कर्ष निघतो की, भाद्रपदातील शुक्ल तृतीयेला गौरी अथवा उमामहेश्वरांचे पूजन विहित आहे आणि तिथींमधील तृतीया ही बहुतांशी गौरीशी संबंधित आहे. भाद्रपद शुक्ल तृतीयेला इतकी विविध गौरी व्रते असताना पुन्हा गणेशोत्सवाच्या तिसऱ्या, चौथ्या अथवा पाचव्या दिवशी येणाऱ्या ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी व्रत सांगितले जावे याचे आश्चर्य वाटते. आता या गौरी व्रतासंबंधी विचार करू.
भाद्रपदातील प्राचीन ज्येष्ठा व्रत
चतुर्वर्गचिंतामणीमध्ये हे व्रत वर्णिलेले आहे. त्यात प्रथम िलगपुराणातील रोमहर्षण आणि ऋषी यांच्या संवादातून ज्येष्ठेची आख्यायिका येते. विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळी जीवांना मोहित करण्यासाठी लक्ष्मीचेच दोन भाग विष्णूने केले. वेदपरायण, धर्मनिष्ठ लोकांसाठी त्यांनी लक्ष्मीची योजना केली आणि अधार्मिक लोकांसाठी ज्येष्ठा म्हणजे अलक्ष्मीची योजना केली. समुद्रमंथनाच्या वेळी आधी अलक्ष्मी प्रकट झाली आणि नंतर लक्ष्मी. त्यामुळे अलक्ष्मीला ज्येष्ठा म्हणतात.
ज्येष्ठेचा विवाह दु:सह किंवा कपाल नावाच्या ऋषीबरोबर झाला. तो तिला घेऊन फिरत असता जिथे जिथे धार्मिक कार्य अथवा मंगलमय वातावरण असेल तिथे ती अस्वस्थ होई. एकदा तो अरण्यात गेला असता त्याला मरकडेय ऋषी भेटले आणि त्यांनी त्याला समजावले की, तुझी भार्या केवळ अस्वच्छ, अधार्मिक ठिकाणी, कलहाच्या ठिकाणी, हरिहर भेद मानणाऱ्या लोकांकडे, देविनदकांकडे नांदू शकेल. स्वाभाविकपणे दु:सहाला भयंकर दु:ख झाले. पाताळात घर शोधण्याचे निमित्त सांगून त्याने ज्येष्ठेला तळ्याच्या काठी थांबायला सांगितले आणि ज्या स्त्रिया तुला बली आणि फुले अर्पण करतील त्यांच्या घरी तू कधी जाऊ नकोस, असे बजावले. मग त्याने पाताळात जाण्यासाठी तळ्यात प्रवेश केला आणि तो परतून काही आला नाही.
जेव्हा लक्ष्मीनारायण ज्येष्ठेला भेटले, तेव्हा तिने रडत रडत आपली कथा सांगितली आणि आपण कसे जीवन कंठावे असे विचारले असता, विष्णूने मरकडेय ऋषींप्रमाणे तिच्या स्थानांचे वर्णन केले. अमंगल टाळण्यासाठी ज्येष्ठेला बली आणि पूजेचा हक्क प्राप्त झाला. ब्राह्मण, राजे आणि स्त्रिया यांना ती पूज्य झाली.
तिचे व्रत भविष्यत् पुराणानुसार हेमाद्रींनी लिहिले आहे. यात युधिष्ठिर-कृष्ण संवाद आहे. ‘‘ज्या बाईची मुले गर्भात मरतात अथवा जन्मून लगेच मरतात अथवा तिचा गर्भपात होतो अशा स्त्रीने आणि निर्धन अभागी पुरुषाने अभ्युदयासाठी कोणते व्रत करावे?’’ असा प्रश्न विचारला असता कृष्ण म्हणतो की, ‘‘भाद्रपद मासात शुक्लपक्षी ज्येष्ठा नक्षत्रावर रात्री नृत्य- गायनपूर्वक जागरण करावे आणि ज्येष्ठा अलक्ष्मीची पूजा करावी.’’
पुढे स्कंदपुराणोक्त शिवप्रणीत व्रतविधी हेमाद्रींनी दिला आहे. व्रताच्या आदल्या दिवशी नदीच्या स्वच्छ तीरावरून वाळू आणावी आणि व्रताच्या दिवशी देवीचे ध्यान करून मंडलात त्या मातीला स्थापित करून तिच्यावर सोने, चांदी अथवा तांब्याची ज्येष्ठेची मूर्ती ठेवावी अथवा देवीचे चित्र काढावे किंवा पुस्तकावर देवीचे आवाहन करावे. पूजा झाली की सुवासिनींनी पूजन करून स्वत भोजन करावे. कथा, नृत्य, गायन इत्यादी जागरण करून ब्रह्मचर्य पाळून झोपी जावे. सकाळी पूजा विसर्जति करून देवीला (मातीला) पाण्यात विसर्जति करावे अथवा संध्याकाळीच पूजा विसर्जति करावी. ब्राह्मणांना अपूप आणि वटक दान द्यावेत. अशी पूजा प्रतिवर्षी केली की विद्यार्थ्यांला विद्या मिळते, चांगली पत्नी मिळते, धनप्राप्ती होते, मुले जगतात आणि अनेक सिद्धींचा लाभ होतो. भाद्रपद मास, शुक्ल-अष्टमी, रविवार आणि ज्येष्ठा नक्षत्र असा योग असता त्या देवतेला ‘नीलज्येष्ठा’ म्हणतात. असा योग अतिशय दुर्लभ आहे.
ज्येष्ठागौरीची कहाणी
चातुर्मासातल्या कहाण्यांतील ज्येष्ठागौरीच्या कहाणीत असे सांगितले आहे की, गौरीचा सण असताना एका दरिद्री ब्राह्मणाची लेक गौर आणावी म्हणून हट्ट करते. दारिद्रय़ाला कंटाळून जीव द्यायच्या हेतूने ब्राह्मण तळ्याकाठी जातो. तिथे त्याला एक म्हातारी बाई भेटते आणि ती त्याचे सांत्वन करून त्याच्या घरी येते. तिच्या अल्पशा सेवाशुश्रूषेने ब्राह्मणाचे दारिद्रय़ दूर होते. ती बाई तिसऱ्या दिवशी परत जायचा आग्रह धरते. ब्राह्मणाला दर वर्षी करायचे ज्येष्ठागौरीचे व्रत सांगते. त्यात पाणवठय़ाजवळून दोन खडे आणावे आणि एकाला ज्येष्ठा व दुसऱ्याला कनिष्ठा गौरी अशी नावे ठेवून त्यांचे पूजन करावे. पहिल्या दिवशी आवाहन, दुसऱ्या दिवशी पूजन, भोजन, जागरण आणि तिसऱ्या दिवशी बोळवण असा क्रम ठेवावा. विसर्जनानंतर तिथली माती आणून घरीदारी टाकावी म्हणजे समृद्धी येते.
ज्येष्ठागौरी आणि ज्येष्ठालक्ष्मी
ज्येष्ठा अनेकरूपी देवता आहे. श्रीसूक्तातील ज्येष्ठा ही मलिन, भुकेने व्याकूळ, दरिद्री आहे. पद्मपुराणात तिला भयंकर तोंडाची, लाल डोळे असलेली, राठ िपगट केसांची आणि जर्जर देहाची म्हटले आहे. ती तळ्याकाठी राहणारी, नवऱ्याने टाकलेली दु:खिता आहे. प्राची चौधरी यांनी ‘लोकप्रभा’च्या २०१२ गणेश विशेषांकात वारली-आदिवासी लोकांच्या गौरीगीताचा तपशील दिला होता. त्यातली गौरी घरच्यांकडून आणि समाजाकडून उपेक्षित, वनवासी, अंगावर फोड असणारी आहे. हे वर्णन अलक्ष्मीचे आहे असे सहज ध्यानात येईल. तळ्याकाठी भेटलेली जर्जर देहाची म्हातारी इत्यादी गौरीच्या कहाणीतील वर्णनदेखील ज्येष्ठेच्या पारंपरिक वर्णनाशी जुळणारे आहे, किंबहुना ज्येष्ठागौरी ही गौरी नसून ती लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी आहे असा निष्कर्ष चूक ठरू नये.
ज्येष्ठागौरी व्रताशी ज्येष्ठा व्रताचे विलक्षण साम्य –
१. दोन्ही व्रतात ज्येष्ठा नक्षत्रावर पूजनाचा निर्देश आहे.
२. प्राचीन व्रतात, आदल्या दिवशी नदीची वाळू आणतात. इथे वाळूऐवजी खडे सांगितले आहेत.
३. प्राचीन व्रतात केवळ ज्येष्ठा पूजन होते. इथे ज्येष्ठा आणि कनिष्ठा पूजन आहे.
४. दोन्ही ठिकाणी महानवेद्य आणि नृत्य-गायनपूर्वक जागरण सांगितले आहे.
पूर्वी सांगितलेल्या गौरी व्रतातील काही वैशिष्टय़ेसुद्धा आपल्याला इथे दिसतात. पंचिपडिका व्रतात पाच िपडे असतात आणि हरिकाली व्रतातील सात धान्य असतात. ज्येष्ठागौरी व्रतात त्याऐवजी पाच खडे किंवा सात खडे गौरीच्या आवाहनासाठी वापरतात. हिरवळीचे प्रतीक म्हणून लाल तेरडय़ाचे झाड आणि पावसाळी फुलोरा असतो. चत्र, भाद्रपद आणि माघ तृतीया व्रतात जशी धान्ये, फळे, फुले, मिष्टान्न सुपात ठेवतात, त्याचप्रमाणे गौरीचे ‘वोवसे’सुद्धा सुपात ठेवतात. अशा प्रकारे ज्येष्ठाव्रत आणि गौरीव्रत विधींची सरमिसळ आजच्या ज्येष्ठागौरी व्रतात दिसते.
गणेश-ज्येष्ठा संबंध
स्कंदपुराणातील ज्येष्ठा पूजेच्या तर्पणात, ज्येष्ठा, सत्या, काली, कलिप्रिया, विघ्ना, भाग्या, तापी, श्री, कृष्णा, कृष्णिपगला अशी स्त्रीदेवतावाचक नवे आणि कपाल आणि विनायक अशी पुरुषदेवतावाचक नावे आहेत. यातील काली, कलिप्रिया, विघ्ना इत्यादी नावे ज्येष्ठेचे विघ्नकारकत्व दर्शवतात, तर भाग्या, श्री, सत्या इत्यादी नवे विधायक बाजू दाखवतात. ज्येष्ठेचे दुहेरी रूप गणेशाच्या विघ्नकर्ता आणि विघ्नहर्ता या परस्परविरोधी रूपांशी समांतर आहे.
याहून अधिक महत्त्वाची बाब म्हणजे कपाल आणि विनायक यांना ज्येष्ठा पूजेत मिळालेले स्थान. दु:सहाचे आणखी एक नाव ‘कपाल’ असल्याचे पुराणांतरी सापडते. म्हणजे ज्येष्ठापती या नात्याने त्याला तर्पणाने तृप्त केले गेले पाहिजे. तसेच विनायक हे नाव ज्येष्ठापती या नात्याने सूचित होते का, या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे.
ज्येष्ठेची मूळ प्रकृती उग्र आणि अमंगल आहे. तिच्यापासून रक्षण व्हावे अथवा ती घरातून निघून जावी यासाठी वेदांमध्ये सूक्ते आहेत. पुराणात ज्येष्ठेला निऋती म्हटले आहे. ती सिंहाच्या रथावर आरूढ असते आणि त्या रथामागे वाघ फिरतात तसेच तिला हत्तीचे तोंड असून ती लम्बोदरी आहे असे वर्णन आढळते. बोधायानगृह्य़सूत्राच्या ज्येष्ठाकल्पात तिला हस्तिमुखा आणि विघ्नपार्षदा म्हटले आहे. हे वर्णन विघ्नकारी विनायकाच्या प्रकृतीशी जुळणारे आहे. विनायककल्पात विनायकाला हस्तिमुख आणि विघ्नपार्षद अशी संबोधने आहेत. हे प्रकरण इतक्यावरच थांबत नाही. गणेशसहस्रनामातसुद्धा ज्येष्ठाराज आणि ज्येष्ठामनोरम अशा नामांवरून गणेश ज्येष्ठेचा पती असल्याचे सिद्ध होते. प्रथम विघ्नकर्ता आणि उत्तरोत्तर विघ्नहर्ता म्हणून जशी गणेशाची ख्याती बदलत गेली तशीच ज्येष्ठेची ख्याती बदलली असे दिसते.
ज्येष्ठेचे मंगलमय रूप
बदलत्या ख्यातीला अभिप्रेत असा पालट ज्येष्ठेच्या रूपातसुद्धा झालेला दिसतो. याचा तपशील खालीलप्रमाणे-
१. वेदातील अलक्ष्मी मलिन, भुकेने व्याकूळ, अमंगल, घरात न थांबावी अशी.
२. गृह्य़सूत्रातील ज्येष्ठा ही हस्तिमुखा, विघ्नपार्षदा परंतु श्री, सत्या, वरदा अशा लक्ष्मीवाचक नावांनी संबोधलेली.
३. पद्मपुराणातील ज्येष्ठा जरठ शरीराची, िपगट केसांची तसेच लाल डोळ्यांची, भयंकर आहे.
४. भविष्यत्पुराण आणि स्कंद पुराणातील ज्येष्ठा देवीसदृश सुंदर रूप असणारी आहे.
श्वेतसिंहासनावर बसलेली, श्वेतवस्त्र नेसलेली, पुस्तक, पाश आणि वर देणारे हात असणारी, असे भविष्यत्पुराणातील ज्येष्ठेचे ध्यान आहे. तिला ब्रह्मवादिनी म्हटले आहे. धनुष्य, बाण, दर्पण आणि अन्य अस्त्रे ती धारण करते. स्कंद पुराणात त्रिलोचना, पांढरेशुभ्र दात असणारी, चांदीसारखी कांती असणारी, टपोरे पण आरक्त डोळे असणारी असे तिचे वर्णन आढळते. तिला श्रेष्ठ, तपोनिष्ठ, सत्यवादिनी आणि सरस्वती असे म्हटले आहे. इथे पुन्हा वाघ-सिंहाच्या रथाचे वर्णनसुद्धा आहे, परंतु त्यानंतर लगेच दुग्रेचा एक प्रार्थना मंत्र दिला आहे.
पत्नी आणि पुत्रांसह समृद्धीच्या वर्धनाची कामना ठेवून आणि अलक्ष्मीचा नाश व्हावा यासाठी ज्येष्ठेचे व्रत सांगितले आहे. पुरुष आणि स्त्री या दोघांनाही समंत्रक पूजनाचा अधिकार आहे. इथे ज्येष्ठेच्या मूळ कार्याचे स्मरण करून असे म्हटले आहे की, जसे मीठ पाण्यात विरघळून जाते तसाच ज्येष्ठापूजकांच्या विघ्नांचा नाश होतो. विद्यार्थ्यांना विद्या मिळते आणि विवाहेच्छुक युवकांची लग्ने जुळतात.
वरील वर्णनावरून ज्येष्ठा उत्तरोत्तर काळात सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गा यांच्याशी तादात्म्य पावली असे दिसते. अमंगळाची सावलीसुद्धा तिच्यापासून दूर झाली. विघ्नहर्त्यां विनायकाची पत्नी असूनही ती कधी गौरीच्या रूपाने गणेशाची आई म्हणून पुजली जाते, तर कधी ज्येष्ठा (अलक्ष्मी) आणि कनिष्ठा (लक्ष्मी) या जोडरूपात पुजली जाते. ‘स्त्री ही क्षणकाळची पत्नी आणि अनंतकाळची माता असते’ ही म्हण ज्येष्ठा-गणपतीसंबंधातून सोदाहरण स्पष्ट होते.
उपसंहार
अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसंभव: यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञ: कर्मसमुद्भव: याचा अर्थ असा की, अन्नामुळे जीव जन्माला येतात. पावसाने अन्न निर्माण होते. यज्ञामुळे वृष्टी होते आणि यज्ञ कर्मामुळे जन्मास येतो. या गीतावचनानुसार यज्ञातून (कर्मातून) पर्जन्य (अनुकूलता) निर्माण करण्याची धडपड माणसाने अनादी काळापासून चालवली आहे. दृश्य परिसर आणि परिस्थिती यांचा सामना तो त्याच्या अक्कलहुशारीने आणि बाहुबलाने करीत होताच, परंतु काही वेळा परिस्थिती त्याच्या आटोक्याच्या बाहेर जात असे. जे आपल्याला नियंत्रित करता येत नाही, ते कुठली तरी देवता नियंत्रित करीत असली पाहिजे अशी जाणीव पुरातन काळापासून मानवाच्या मनात घर करून आहे. त्या देवतांना अनुकूल करण्यासाठी नाना व्रते निर्माण झाली. व्रते ही माणसाच्या सामाजिक परिस्थितीचा आणि आकांक्षांचा आरसा आहेत. कालानुरूप त्यांत बदल होताच असतो.
आसेतु हिमाचल भारतात आणि भारताबाहेरही गणेशोपासना होत असली तरी गणेशोत्सव महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात अधिक प्रतिष्ठा पावला. जेव्हा एखाद्या प्रदेशात एखादे दैवत मोठे होते तेव्हा त्याच्या आजूबाजूची प्रस्थापित दैवते आणि त्यांचे उत्सव आपसूकच उन्नत होणाऱ्या देवतेत सामावतात. चतुर्थी व्रताच्या निमित्ताने विविध गणेश व्रतांचे पलू, त्यांची धार्मिक व सामाजिक उद्दिष्टे आणि त्यांचे परस्पर प्रभाव आपण पाहिले. तसेच गणेशाबरोबर त्याचे मातापिता उमा-महेश्वर आणि त्याची सहचरी ज्येष्ठा यांचे उत्सव कसे जोडले गेले असतील याचे सिंहावलोकन आपण केले. शेवटी गजाननास हीच प्रार्थना की-
पुराणग्रंथांमधी धुंडिता,
संस्कृतिचा मागोवा घेता,
तथ्य दिसे ते स्वीकृत व्हावे
विस्कटता नच भावभक्तिची घडी,
वाहतो ही दुर्वाची जुडी..
चंद्रशेखर खांडाळेकर
चंद्रशेखर खांडाळेकर